छत्रपती संभाजीनगर: क्रीडा विभागात उघडकीस आलेल्या 21.59 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागरला अखेर अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने हर्ष कुमारला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि 8 पथके स्थापन केली होती.
घोटाळ्यातील वापर आणि हर्ष कुमारचे ऐशोआराम
तपासात उघडकीस आले की, हर्ष कुमारने या घोटाळ्यातून मिळालेल्या रकमेचा वापर करून आपले जीवनशैली उंचावली होती. त्याने चतुर्थीच्या दिवशी 1.26 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार खरेदी केली, तसेच महिन्याभरापूर्वी 22 लाख रुपयांची सुपरबाईक घेतली. त्याचबरोबर, 35 लाखांचे हिरेजडीत गॉगल एका सराफाकडे दुरुस्तीसाठी दिले होते. हर्षने आलिशान वसाहतीतील भाड्याच्या फ्लॅटसोबत दोन फ्लॅट देखील खरेदी केले आणि ब्रॅण्डेड कपडे, शूज आणि इतर महागड्या वस्तूंसाठी विविध दुकानांमध्ये 70 हजार रुपयांचे व्यवहार केले, असे तपासात उघडले आहे.
तपास अद्याप सुरू
हर्ष कुमार क्षीरसागरच्या संपत्तीचा आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच, या प्रकरणात इतर कोणी सामील आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.