2.7 C
New York
Tuesday, December 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

अवघी दुमदुमली आळंदी

अवघी दुमदुमली आळंदी

छत्रपती संभाजीनगर – नभी फडकणारी भगवी पताका अन मुखी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराज की जय’ चा जयघोष क्षणाक्षणाला वाढणारा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि त्यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं, निमित्त होत.. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं. रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर अशा आनंदानुभव उपस्थितांनी याप्रसंगी घेतला. येत्या १८ एप्रिलला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटातील आपल्या संत भूमिकेच्या रूपात दर्शन दिलं.

असामान्य बुद्धिमत्ता आणि भक्तीयोगमार्गात उच्च स्थान प्राप्त केलेल्या संत मुक्ताई या अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे जीवन जगल्या. मानवी मनाचे समुपदेशन करणाऱ्या आदीशक्ती मुक्ताईचे नाव स्त्री संतांच्या मांदियाळीत प्रामुख्याने घेतले जाते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई. ही चारही भावंडे विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तीमंत दिव्य स्वरूप होत. बोलण्यात स्पष्टता आणि कठोरता असणाऱ्या मुक्ताईने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी भावंडांचे आईपण स्वीकारत शिष्यांवर मायेची चादर पांघरली. अशा संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत  समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा  चित्रपटात भूमिका आहेत.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या