-3.5 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्री बंडू नाना आधार पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न – सौ. खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय, दोंडाईचा येथे भावनिक वातावरणात सत्कार सोहळा

दोंडाईचा (प्रतिनिधी) :
दिनांक २२ जून २०२५, रविवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्व. खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय, दोंडाईचा येथे शाळेतील सेवाभावी व कर्तव्यनिष्ठ शिक्षकेतर कर्मचारी श्री बंडू नाना आधार पाटील यांचा भावपूर्ण सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन माननीय संस्था अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या आदेशाने व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवाजीराव साळुंके पाटील साहेबांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री जितेंद्र गिरासे (भा.ज.पा. शहराध्यक्ष, दोंडाईचा), श्री प्रवीण महाजन (माजी शहराध्यक्ष), तसेच संस्थेच्या सचिव सौ. छायाताई साळुंके पाटील यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर बंडू नाना पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन संस्थाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या धर्मपत्नी सौ. मीनाताई पाटील यांचाही संस्थेच्या सचिवांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

बंडू नाना पाटील यांचे नातेवाईक – भगिनी सौ. सुनंदाताई आहिरे, पाहुणे श्री नरेंद्रराव आहिरे, श्री अरुणराव पाटील, आणि परिवारातील इतर सदस्य तसेच मोराणे येथील मतिमंद विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी बंडू नाना यांच्या सेवाभावी कार्याबद्दल मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या विशेष शिक्षिका मनीषा घुगे मॅडम यांनी प्रस्तावना सादर केली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन श्री किशोर शेलार सर यांनी केले, तर श्री अतुल पाटील सर यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान बोलताना बंडू नाना पाटील हे भावुक झाले होते. त्यांनी आपल्या सेवेचा आढावा घेताना संस्थेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. अध्यक्षीय भाषणात शिवाजीराव साळुंके पाटील साहेबांनी बंडू नाना यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी आंब्याचा रस आणि पुरणपोळीचे स्वादिष्ट जेवण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम अतिशय आनंददायी, स्नेहमिलनमय व स्मरणीय वातावरणात पार पडला. बंडू नाना पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा हा संस्थेच्या व शाळेच्या इतिहासात एक संस्मरणीय घटना ठरली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या