पणजी, २८ जुलै २०२५: वारसाहक्काच्या किंवा संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या कुटुंबांचे जीवन सुलभ करण्यासाठी गोवा सरकारने एक महत्त्वपूर्ण सुधारणा सुरू केली आहे. या सुधारणेमुळे आता अशा कुटुंबांना त्यांच्या घरातील भागासाठी स्वतंत्र घर क्रमांक मिळू शकणार आहे. ही सुविधा विशेषतः नागरी क्षेत्रांमधील विभक्त कुटुंबांना त्यांच्या नावे पाणी व वीजजोडणी मिळवण्यासाठी मदत करणार आहे, तीही कोणतीही जटिल कागदपत्रे न देता.
या सुलभ प्रक्रियेनुसार, अर्जदाराला मालकीचे दस्तऐवज सादर करण्याची आवश्यकता नाही. सर्व महापालिका व नगर परिषदांना असे अर्ज १५ कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गोव्याच्या १४ नगर परिषद क्षेत्रांतील २०,००० हून अधिक कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होण्याची शक्यता आहे. अर्जदाराने त्याच्या ताब्यातील भागाचा आराखडा, नवीनतम घर कर पावती, ओळखपत्र, मूळ मालकाचा मृत्यू दाखला (आवश्यकता भासल्यास) आणि प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. अर्ज फॉर्म Aद्वारे केला जाऊ शकतो आणि त्यासोबत फॉर्म I व XIV किंवा फॉर्म D जसे आवश्यक दस्तऐवज जोडावे लागतील.
हा स्वतंत्र घर क्रमांक फक्त कर व उपयोगिता सेवा (पाणी/वीज) मिळवण्यासाठी दिला जाणार असल्याने याद्वारे कोणत्याही मालकी हक्काची हमी मिळणार नाही.
ही सुधारणा नागरिकांच्या कल्याणासाठी, सुलभ प्रशासनासाठी आणि चांगल्या शासकीय कार्यपद्धतीसाठी सरकारची वचनबद्धता दर्शवते. प्रत्येक गोमंतकीयाचा सन्मान, स्वावलंबन आणि सुलभ जीवन सुनिश्चित करणाऱ्या विकसित गोव्याच्या दिशेने हा एक ठोस पाऊल आहे.