3.3 C
New York
Saturday, December 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

भारतीय शेतीचा जागतिक दरबारात गौरव : ‘कृषिभूषण’ गोरखनाथ गोरे यांचे शेवगा तंत्रज्ञान नेपाळच्या डोंगरात पोहोचले

 

 

छत्रपती संभाजीनगर /भानुदास मते पाटील  कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी गोरखनाथ गोरे यांनी भारतीय शेतीत प्रयोगशीलतेच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली असून आता त्यांचे कृषी ज्ञान आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचले आहे. नुकतेच गोरे हे नेपाळमधील करनाली राज्यातील दहलेख जिल्ह्यातल्या छैपाडी या दुर्गम भागात शेवगा पिकाच्या मार्गदर्शनासाठी गेले होते. तिथल्या स्थानिक शेतकरी योगी भूपेंद्र बहादूर शिजापती यांनी भारतातून थेट त्यांना आमंत्रित करून आपल्या शेतात सेंद्रिय शेवगा शेतीसाठी विशेष मार्गदर्शन घेतले.

 

 

१८ वर्षांचा अनुभव, सातत्यपूर्ण प्रयोगशीलता

गोरखनाथ गोरे यांना शेवगा आणि डाळिंब पिकांचा १८ वर्षांचा सखोल अनुभव आहे. त्यांच्या शेतात गांडूळखत निर्मिती, बीज उत्पादन, सेंद्रिय शेती आणि नवजात वाणांच्या संशोधनावर विशेष भर दिला जातो. त्यांनी शेवग्यावर सातत्याने प्रयोग करत सात वेळा निवड (selection) करून एक अत्याधुनिक सुधारित जात विकसित केली आहे.
या जातीमध्ये शेंगांचे गर्द हिरवेपणा, एकसमान लांबी, लवकर सेटिंग, अधिक उत्पादन आणि रोगप्रतिकारक क्षमता यांसारखी ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही जात स्थानिक बाजारात तसेच आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरत आहे. गोरे लवकरच या नवजात शेवगा जातीचे पेटंट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पतंजली योगपीठ ते नेपाळ : ज्ञानाचा विस्तार

या आधी गोरे यांनी हरिद्वार येथील पतंजली योगपीठात शेवग्याची यशस्वी लागवड करून दिली होती. याच माध्यमातून त्यांचा योगी भूपेंद्र शिजापती यांच्याशी संपर्क आला. शिजापती हे करनाली राज्यात राहणारे, अत्यंत दुर्गम भागातील शेतकरी आहेत. त्यांच्या भागात वीज, सिंचन, विहिरीची कुठलीही सोय नाही. संपूर्ण शेती पावसावर अवलंबून असून, डोंगराळ प्रदेशामुळे शेतीसाठी अनेक अडथळे आहेत.

तरीही, त्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला आहे. पारंपरिक पिकांमधून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी नवकल्पनांकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेवग्याच्या औषधी व पोषणमूल्यांकडे पाहता, तसेच त्याच्या निर्यात आणि प्रक्रिया उद्योगातील संधी लक्षात घेता त्यांनी शेवग्याचे बियाणे गोरे यांच्याकडून घेतले आणि आपल्या शेतात लागवड सुरू केली.

https://youtu.be/6YzsdJDJFRo?si=PUACAOTM9QGS84wm&t=3

औषधी उपयोग, व्यावसायिक संधी

भूपेंद्र शिजापती यांनी बीएनवायएस (Bachelor of Naturopathy and Yogic Sciences) शिक्षण घेतले आहे. या शिक्षणातून त्यांना शेवग्याच्या आरोग्यवर्धक आणि औषधी उपयोगाची जाणीव झाली. त्यांनी केवळ शेंगांचे उत्पादन न करता, शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करून विक्री करण्याचा पर्यायही स्वीकारला आहे.
त्यामुळे डोंगराळ व दुर्गम भागात राहूनही त्यांनी शेवगा शेतीच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन आणि सेंद्रिय उत्पादनाची दिशा निवडली आहे. हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे की, योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास कोणतीही अडचण शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही.

गोरेंचे मार्गदर्शन अमूल्य’ – नेपाळमधून आभार

गोरे यांच्या या मार्गदर्शनाबद्दल भूपेंद्र शिजापती आणि त्यांच्या पालकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. शेवग्याच्या नवजात जातीसह लागवड, खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि उत्पादन प्रक्रियेबाबत गोरे यांनी दिलेले मार्गदर्शन शिजापती यांच्या शेतीला नवे दिशा देणारे ठरले आहे.

भारताचे ज्ञान आता जागतिक स्तरावर

या सर्व घडामोडींमुळे गोरखनाथ गोरे यांचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताच्या पलीकडेही पोहोचले आहे. त्यांच्या नवकल्पना, प्रयोगशीलता आणि कृषी तंत्रज्ञानाचा लाभ नेपाळच्या डोंगराळ भागात मिळत आहे, हे भारतीय शेतीसाठी अभिमानास्पद आहे. अशा प्रगतिशील शेतकऱ्यांचे ज्ञान जागतिक स्तरावर पोहोचवणे ही काळाची गरज आहे आणि गोरे यांचे यामधील योगदान उल्लेखनीय ठरत आहे.

शेवटी, देशासाठी गौरवाची बाब

गोरे यांच्या यशामागे त्यांचे सातत्य, प्रयोगशीलता आणि शेतीबाबतची समर्पित भावना आहे. त्यांच्या कार्यातून भारतीय कृषी संस्कृतीची ताकद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दोन्हींचे सुंदर उदाहरण उभे राहत आहे. त्यांच्या ज्ञानामुळे केवळ एक शेतकरी नव्हे, तर संपूर्ण भारताचा सन्मान वाढत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या