![]()
संभाजीनगर: महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन महिला अघाडि च्या वतीने क्रांति चौक येथे निदर्शने आयोजित करण्यात आली. विशेषतः कोलकाता आणि बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
या निदर्शनात शंभरपेक्षा जास्त बँक कर्मचारी, महिला व पुरुष, सहभागी झाले. स्टेट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी आपल्या भाषणात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे असे स्पष्ट केले. त्यांनी सरकार आणि समाज दोघांनाही या गंभीर घटनांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
कॉम्रेड सुखदा देशपांडे, आकाश जाधव, नीलम पाटील यांसारख्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. विशेषत: बँक ऑफ इंडिया मधील अंध बँक कर्मचारी कॉम्रेड प्रियंका निकाळजेने या निदर्शनात सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
कॉम्रेड श्रुतिका मोहोड, शीला खरात, ज्योती कुलकर्णी, पीयुष बीराडे, राजेंद्र देवळे, प्रतीक्षा पवार, नेहा भिरांगे, वर्षा पाथरकर यांसारख्या इतर अनेक नेत्यांनीही या कार्यक्रमाचे नेतृत्व केले. यावेळी समाजातील महिला आणि पुरुषांना एकत्र येऊन अत्याचार विरोधी आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले.